पुस्तक ओळख: रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गूढकथा

लेखक: रवि आमले
किंमत: रु २६९
उपलब्ध: ऍमेझॉन
भाषा: मराठी

सध्या नेटफ्लिक्सवर बऱ्याच गुप्तहेरांशी संबंधित काही मालिका आणि सिनेमे बघण्यात आले. अर्थातच ते परदेशी सिनेमे होते. बहुतांश मोसाद वर आधारित होते. मोसाद या इस्राएलच्या गुप्तहेर संस्थेबद्दल मला कायमच कुतूहल होतं. मोसादच्या कारवायांबद्दल बरीच पुस्तक उपलब्ध आहेत.

मग प्रश्न उभा राहिला की भारतातली गुप्तहेर संगठना “रॉ” बद्दल काही माहिती मिळू शकेल का? गुप्तहेर संघटना असल्याने सत्य कधीच बाहेर येणार नाही हे माहीत होत पण सत्याच्या जवळ जाणाऱ्या पुस्तकाच्या शोधात होतो. सध्या भारतीय गुप्तचर संस्थेच्या सूरस कथा सांगणारे भक्तिरसाने ओतपोत असे बरेच सिनेमे निघत आहेत, ते मला फारच सुमार वाटतात. गुप्तहेर संघटनेचं काम इतकं ग्लॅमर्स नसत याची मला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे या असल्या सिनेमांपासून मी दोन हात दूरच राहतो.

चांगल्या पुस्तकाचा शोध हा मराठीत लिहिलेल्या “रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गूढकथा” या पुस्तकावर येऊन थांबला. हे पुस्तक रवि आमले यांनी लिहिले आहे. पुस्तक आपल्याला सुरुवातीपासूनच खेळवून ठेवते.

जगातल्या सर्वोत्कृष्ट गुप्तहेरांमध्ये ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते ते रामेश्वर नाथ काव यांनी रॉ या संस्थेला उभारण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. त्यांच्या कारवायांचा इतर देशांनी इतका धसका घेतला होता की या गुप्तहेर संघटनेत काम करणाऱ्यांना “काव बॉयस” असे ते आदराने म्हणत असत.

स्वातंत्र्यानंतरच्या काळामधील इतिहास आणि महत्वाच्या घटनांमध्ये राव यांनी वठवलेली भूमिका या पुस्तकात सांगितली आहे. बांगलादेश स्वातंत्र्य युद्ध, सिक्कीमचे देशात विलीनीकरण, इतर देशातल्या कारवाया यांचे रोचक किस्से सांगण्यात आले आहे. रॉ च्या कारवायांबद्दल माहितीचा खजिनाच लेखकाने उपलबध्द करून दिला आहे. गुप्तहेरांबद्दल मराठीमध्ये इतके विस्तृत पुस्तक माझ्या वाचनात आले नाही. त्यासाठी लेखकाचे अभिनंदन.

पडद्यामागे कशी सूत्र हलवली जातात आणि शहाला कश्याप्रकारे काटशह दिला जातो याच्या बऱ्याच घटना आपणास कळतात. येथे शत्रू देशातील कारवाया, सत्तापरिवर्तन याबद्दल नवीन माहिती कळते. साम दाम दंड भेद या नीतींचा कसा सर्रास वापर केला जातो याबद्दलच्या काही कथा भुवया उंचावण्यास लावतात. रॉ च्या कार्यपद्धतीमध्ये चाणक्यच्या कूटनीतीचा संदर्भ वारंवार येतो.बऱ्याच रंजक कथा आहेत काही कथा तुमची उत्कंठा वाढवण्यासाठी संक्षिप्त स्वरूपात सांगत आहे.

पूर्व पाकिस्तान म्हणजेच आत्ताचा बांगलादेश. तेथे पाकिस्तानी सैन्यांनी थैमान घातले होते. जनतेचा आवाज क्रूरपणे चिरडून टाकण्यात येत होता. भारत बांग्लादेशी स्वातंत्र्य सैनिकांना मदत करत होता. त्याचवेळेस काश्मीर मध्ये एका दहशतवाद्यास पकडण्यात आले. त्याच्या उलट तपासणीत तो विमान अपहरणासाठी भारतात आला आहे, पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेने त्याला पाठविले आहे असे सांगितले. रॉ चे मुख्य काव यांच्या कानावर ही गोष्ट घालण्यात आली. काव यांनी त्या दहशतवाद्याला सोडून देण्यास सांगितले आणि त्या दहशतवाद्यास भारतीय विमानाचे अपहरण करू दिले. विमान अपहरणामुळे भारतात एकच गहजब उडाला. विमान अपहरण करून पाकिस्तानात नेण्यात आले. भारतीय तुरुंगात असलेल्या दहशदवाद्यांना सोडून प्रवाश्यांची सुटका करण्यात आली. पडद्यामागच्या गोष्टींची भारतीय लोकांना कल्पना न्हवती. इंदिरा गांधींवर सगळीकडून टीका होत होती. भारत एक कमजोर राष्ट्र आहे असे वर्तमान पत्रात लिहून येत होते. इंदिरा गांधी या गोष्टीची वाटच पाहत होत्या. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचा निषेध नोंदवत पाकिस्तानसाठी भारतीय हवाई हद्द बंद केली. त्यामुळे पाकिस्तानची मोठीच अडचण झाली. तेव्हा पाकिस्तान मोठ्या प्रमाणात बांगलादेश मध्ये सैन्य हलवण्याच्या तयारीत होता. भारतावरून विमान नेण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा सोयीस्कर पर्याय न्हवता. भारताच्या या निर्णयामुळे त्यांचा वेग मंदावला. याचा फायदा भारताला झाला. भारताने बांगलादेशमध्ये सैन्य घुसवून त्यास स्वतंत्र केले हा इतिहास आपल्याला माहीतच आहे. असे कूटनीतीचे बरेच किस्से पुस्तकात आहे.

दुसरा किस्सा:
सत्तरच्या दशकात मिझोराम राज्यात दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातला होता. वेगळ्या देशाची मागणी जोर धरू लागली होती. शेजारील देश दहशतवाद्यांना सर्रास त्यांचा भूमीचा वापर करू देत होते. एके दिवशी अचानक भारतीय सरकारी कार्यालयांवर दहशतवाद्यांनी हल्ला करून भारताशी या राज्याचा संपर्क तोडला. भारतीय सैनिक मोठ्या प्रतिकारामुळे त्यांच्या लष्करी तळात अडकून पडले होते. मिझोरामने एकतर्फी स्वातंत्र्य घोषित केलं. त्यांना जेरीस आणण्यासाठी भारताला स्वतःच्याच राज्यात हवाई हल्ले करावे लागले. या हल्ल्यामध्ये जे वैमानिक होते त्यातील दोन लोक नंतर प्रसिद्ध व्यक्ती झाले. एक होते राजेश पायलट आत्ताचे राजस्थानचे जे उपमुख्यमंत्री आहेत सचिन पायलट त्यांचे वडील आणि दुसरे सुरेश कलमाडी. मला वाटत यांची ओळख करून द्यायची गरज नाही.

असे बरेच किस्से या पुस्तकात आहेत. रॉ च्या फक्त यशस्वी कारवाया आहेत असे लेखकाने आधीच नमूद केल्याने पुस्तक एकतर्फी वाटत नाही. काही अपयशाचा उल्लेख आहे. पण तो माफक.

ज्यांना भारतीय राजकारण, गुप्तहेर संघटना, त्यांच्या कारवाया यांबद्दल जाणून घ्यायचं असेल त्यांच्यासाठी हे पुस्तक योग्य आहे.

लेखक : कर्ण उर्फ सौरभ

One thought on “पुस्तक ओळख: रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गूढकथा

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s